बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

उत्तर धृव व दक्षिण धृव


══════════════════════

   @ संकलन 

  *श्री. गजानन गोपेवाड 

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *उत्तर ध्रुवापेक्षा दक्षिण ध्रुव जास्त थंड का आहे ?* 

***********************************

प्रथम खरोखरच दक्षिण ध्रुव उत्तर  ध्रुवापेक्षा जास्त थंडं आहे का, याचा विचार करूया. १९५७ पासून दक्षिण ध्रुवावरच्या दैनंदिन तापमानाच्या नोंदी ठेवावयास सुरुवात झाली. त्यावरून स्पष्ट झालं आहे की ऑगस्ट महिना हा तिथला सर्वात थंड महिना असतो. त्या महिन्यातलं गेल्या ५० वर्षांमधील सरासरी तापमान उणे ६० अंश राहिलं आहे. उलट जानेवारी महिना सर्वात 'गरम' असतो. त्यावेळचं सरासरी तापमान उणे १८ अंश असतं.

 

उत्तर ध्रुवावरच्या तापमानाच्या नोंदी ठेवायला अलीकडेच म्हणजे २००३ सालापासून सुरुवात झाली. तेव्हा गेल्या पाच सहा वर्षांमधल्या तापमानाच्याच नोंदी उपलब्ध आहेत. तरीही त्यावरून असं दिसतं की तिथलं सर्वात कमी सरासरी तापमान उणे ४० अंशांइतकंच असतं. तर सर्वात जास्त सरासरी तापमान शून्य अंशापर्यंत चढतं. तेव्हा दक्षिण ध्रुव हा उत्तर ध्रुवापेक्षा जास्त थंड आहे हे आता पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे.

 

 कोणत्याही ठिकाणचं तापमान हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. त्यातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्या ठिकाणी पडणाऱ्या सूर्यप्रकाशातून मिळणारी उष्णता. विषुववृत्तावर पडणारे सूर्याचे किरण सरळ उभे म्हणजे जवळजवळ ९० अंशांचा कोन करून पडतात. त्यामुळे त्या प्रदेशातील कोणत्याही ठिकाणाला मिळणारी सूर्याची उष्णता सर्वात जास्त असते. तेव्हा तिथलं तापमान सर्वात जास्त असायला हवं; पण विषुववृत्तावरची एखादी जागा समुद्रसपाटीपासून उंचावर असेल तर तिथलं तापमानही घसरतं. शिवाय अशी जागा समुद्रकिनाऱ्यापासून अात किती दूरवर आहे, तिथलं वातावरण किती कोरडं आहे वगैरे अनेक बाबींवर तिथलं तापमान अवलंबून असतं.

 

 उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर पडणारे सूर्याचे किरण सरळ पडत नाहीत. तिथल्या आकाशात सूर्य जास्तीत जास्त २३ अंशांपर्यंतच चढतो. अशा आडव्या पडणाऱ्या किरणांपासून त्या प्रदेशाला मिळणारी सूर्याची उष्णताही कमी असते. त्यामुळे तिथलं सरासरी तापमान नेहमी फारच कमी असतं. अगदी कडक उन्हाळ्यातही ते शून्य अंशाखालीच राहतं. शिवाय तिथं सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते. त्यामुळेही तिथलं तापमान फारसं चढत नाही.

 

 उत्तर आणि दक्षिण ध्रुव यांच्यामध्ये इतर काही मूलभूत फरक आहेत. दक्षिण ध्रुव अंटार्क्टिक खंडावर वसलेला आहे. म्हणजेच त्याच्या पायाखाली जमीन आहे. शिवाय त्या जमिनीवर जवळजवळ ) ९००० फूट उंचीचे बर्फाचे थर जमलेले आहेत. म्हणजेच दक्षिण ध्रुवाची समुद्रसपाटी पासूनची उंची तेवढी आहे. सहाजिकच तिथलं तापमान समुद्रसपाटीवर असणार्‍या उत्तर ध्रुवापेक्षा कमी असतं. शिवाय उत्तर ध्रुवांभोवती पसरलेल्या अंटार्क्टिक महासागरामुळे सूर्याची उष्णता जास्त प्रमाणात शोषली जाऊन तापमान वाढायला मदत होते.

 

*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: