शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*

 *🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*

➿➿➿➿➿➿➿➿➿

       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳

                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : gajanan gopewad

                                                   

➿➿➿➿➿➿➿➿➿

🚩🤺🚩🇮🇳👳‍♀️🇮🇳🚩🤺🚩


                   *नरवीर*

    *तानाजी काळोजीराव मालुसरे*

         ( शिवरायांचे सरदार )


       *जन्म : इ.स. १६२६*

*(जावळी, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत)*


       *वीरमरण : ४ फेब्रुवारी १६७०*

   *(सिंहगड, पुणे, महाराष्ट्र, भारत)*


टोपणनाव : तान्हाजी

अपत्ये : रायबा


तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सरदार होते. त्यांनी स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता.


🙎‍♂️ *बालपण*

                   सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडवली गावात तानाजी मालुसरे यांचे बालपण गेले.


🤺 *कामगिरी*

         अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.


🤺 *नरवीर तानाजी मालुसरेची एक अपरिचित लढाई*

                  तानाजी मालुसरे असे नाव घेतले की लोकांना त्याच्या सिंहगडावर केलेल्या पराक्रमाची आठवण होते. सर्वसामान्यांसाठी त्यांचे चरित्र या एकट्या प्रसंगापुरतेच मर्यादित झाले आहे. परंतु त्याने केलेल्या इतर पराक्रमांविषयी सर्व सामान्यांना अजिबातच माहिती नाही. तानाजी मालुसरेचे संगमेश्वरचे युद्ध हे असेच अपरिचित युद्ध आहे. या युद्धाला हवे आहे तेवढे महत्त्व देऊन लेखकांनी जगासमोर मांडले नाही. हा तानाजींवर झालेला अन्यायच आहे.


संगमेश्वरी असतांना शत्रूने केलेल्या अकस्मात हल्ल्यादरम्यान तानाजीने कमालीचे धाडस दाखविले होते. त्या प्रसंगाचे तपशीलवार वर्णन पुढीलप्रमाणे :


दाभोळ, चिपळूण, संगमेश्वर काबीज झाले, राजापूर लुटले गेले. ह्या बातम्या धडाधड आदिलशाहाच्या कानावर आदळत होत्या. तो या बातम्यांनी अस्वस्थ झाला. त्याने लगेच शृंगारपूरच्या सूर्याजीस आदेश केला. तो त्याला म्हणाला_ "तो (शिवाजी महाराज)आमचा उघड शत्रू, राजापुरावर चालून जात असताना त्यास तू का अडविले नाहीस? असो ते जाऊ दे, तो आता परत त्याच मार्गाने जवळ आला आहे. तेव्हा त्यास तेथे अडव व त्याच्याशी युद्ध कर,'. आदिलशाहाच्या दबावाखाली सूर्याजीने शिवाजी महाराजांच्या विरोधात उघडउघड शत्रुत्व धारण केले.

                        तेव्हा सूर्याजीं सुर्वे शृंगारपूरला होता. त्याने लगेच शिवाजी राजांच्या संगमेश्वरी असलेल्या सैन्यावर धावा बोलला. संगमेश्वरी शिवाजी राजांचे सैन्य अल्पसे होते. या अल्पशा सैन्याला सूर्याजीच्या सैन्याने चोहो बाजूंनी घेरले. शिवरायांनी या सैन्याचे नेतृत्व तेव्हा पिलाजी निळकंठरावाकडे दिले होते. आपले सैन्य शत्रूने चारही बाजूंनी घेरले आहे, असे जेव्हा पिलाजीला समजले तेव्हां पिलाजीं फ़ार भयभीत झाला. शत्रूला सामोरे जाऊन त्याच्याशी युद्ध करण्यापेक्षा युद्धातून पळून जाणेच त्यांनी योग्य ठरवले. ते आपला जीव वाचवण्याच्या भीतीने संगमेश्वरहून पळून जाऊ लागले. तोच भीतीने कापणाऱ्या त्या पिलाजीला आपल्या लोकांना मागे सोडून पळून जातांना तानाजी मालुसरेने पाहिले. तानाजींसारख्या प्रतापी पुरुषाला हे अजिबात खपणारे नव्हते. तानाजीने भ्याड पिलाजीला पळताना पाहताच त्याचा पायीच पाठलाग करून त्याला हातात धरले आणि त्याचा उघड धिक्कार केला. तानाजी मालुसरे पिलाजीस म्हणाला_ "या युद्धात मी तुझा साह्यकर्ता आहे. तू आपल्या लोकांना संकटात टाकून पळून जातोयस, ही खरच खेदाची गोष्ट आहे. आजपर्यंत तू तुझ्या परराक्रमांच्या एवढ्या बढाया मारत होतास त्या सगळ्या बढाया कुठे गेल्या? ज्या शिवाजी महाराजांनी तुला मोठेपण व सन्मानाची देऊन सांभाळले, तू त्यांचा सरदार असतांनाही सैन्य टाकून स्व:तच पळून जातोयस? आणि याची तुला खंतही वाटत नाही...." असे कित्येक कठोर शब्द बोलून तानाजीने पिलाजीला कैद केले. पिलाजीं घाबरलेला पाहुन तानाजीला वाटले की पिलाजीची ही दशा पाहून इतर मावळ्यांचीही हिंमत खचेल. त्यामुळे पिलाजीला मोकळे सोडण्यापेक्षा कैदेतच ठेवणे योग्य असा विचार करून तानाजीने पिलाजीला जवळच असलेल्या एका दगडाला दोरखंडाने बांधून ठेवले. पिलाजीला दगडाला बांधुू ठेवल्यानंतर तानाजी मालुसरेने स्व:तच सैन्याचे नेतृत्व केले.

                     तानाजीने व त्याच्या सोबती मावळ्यांनी शत्रूवर जोरदार हल्ला चढवला. शत्रूनेही तानाजीस रोखण्याच्या दिशेने पुढे सरसाव केला. आता दोन्ही सैन्य एकमेकांना भिडणार आणि रक्ताच्या चिळकांड्या उडणार तोच मराठ्यांच्या मागच्या तुकडीने तानाजीच्या रक्षणासाठी शत्रूवर बाणांचा वर्षाव केला. त्यामुळे तानाजीच्या समोर येणारी शत्रुची तुकडी घायाळ झाली आणि याचा फ़ायदा उचलत तानाजीच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी शत्रुची दाणादाण उडवली. तानाजीची मागची तुकडी शत्रूच्या पुढे सरसावणाऱ्या तुकड्यांवर बाणांचा वर्षाव करी व बाणांनी जखमी झालेल्या शत्रुच्या सैन्याला तानाजी सोबती मावळे कापून काढीत. मावळ्यांनी तानाजीच्या नेतृत्वाखाली शत्रूशी रात्रभर झुंज दिली व शत्रूच्या हातपाय कापलेल्या व धडापासून मुंडके वेगळे पडलेल्या शवांचे ढीगच्या ढीग मावळ्यांनी रणांगणात रचले. शेवटी सूर्याजीला या युद्धात मोठे नुकसान सोसावे लागले. त्याला त्याच्या सैन्याची सर्वत्र दशा झालेली दिसताच त्याने युध्दातुन पळ काढला. शेवटी वीर तानाजी मालुसरेंचा व सोबती मावळ्यांचा या युध्दात विजय झाला.

संदर्भ - शिवभारत

            स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणाऱ्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन तो राहिला होता. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्याने सहभागी करून घेतले.


🤺 *कोंढाण्याची लढाई*

                स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा तो स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होता. त्याने ती तयारी अर्धवट सोडली. स्वराज्यासाठीचे आपले काम प्राधान्यात घेऊन जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. तो कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाला. *"आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे."*  हे त्याचे शब्द इतिहासात अजरामर झाले आहेत.

                      कोंढाणा गडावरचा किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य अष्टमी) रात्री तानाजी मालुसरे याच्या नेतृत्वाखाली राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसा चढणे कठीण होते. तानाजीने गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागून 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली.

           तिथे झालेल्या अटीतटीच्या लढाईत तानाजीला त्याच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसऱ्या दिवशी शिवाजीराजे सिंहगडावर पोचले तेव्हा त्यांना समजले.. महाराज म्हणाले  *"गड आला पण सिह गेला".* अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या 'उमरठे' 

 (पोलादपूरजवळ)  या गावी पाठवले. ज्या मार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'वीरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारकसुद्धा उभे केले गेले.


🗽 *तानाजीची स्मारके*

                    तानाजी मालुसरेच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. पुणे शहरातील वाकडेवाडी या भागाचे नाव बदलून ते नरवीर तानाजी वाडी असे करण्यात आले.

पुण्याजवळील सिहंगडावर नरवीर तानाजी मालुसरेचे स्मारक असून, त्यांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी आहे.

रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.


📚 *पुस्तक*


दुर्ग सिंहगड - आनंद पाळंदे

गड आला पण सिंह गेला - ह.ना. आपटे

नरवीर तानाजी मालुसरे (बालसाहित्य) - पंडित कृष्णकांत नाईक

तानाजी (अमर चित्र कथा -६८२)

मराठ्यांची धारातीर्थे - प्रवीण भोसले, नरसिंह पब्लिकेशन्स

राजाशिवछत्रपती - ब.मो. पुरंदरे, पुरंदरे प्रकाशन

सिंहगड - पुरंदरे प्रकाशन

सिंहगड - प्र. के. घाणेकर

सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे - दत्ताजी नलावडे


🎖️ *पुरस्कार*


तानाजीच्या नावे शिवाजी ज्ञानपीठ इंटरनेशनल संस्थेचा वीर तानाजी मालुसरे राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.


🎞️ *चित्रपट*


▪️"तान्हाजी : द अनसंग वाॅरिअर" (हिंदी चित्रपट, सन २०२०, तानाजीच्या भूमिकेत अजय देवगण); दिग्दर्शक - ओम राऊत.

▪️यापूर्वी १९५२ साली राम गबाले यांनी दिग्दर्शित केलेला 'नरवीर तानाजी' हा मराठी चित्रपट निघाला होता. चित्रपटात दुर्गा खोटे आणि मास्टर विठ्ठल यांच्या भूमिका होत्या.


 🚩 *हर हर महादेव....!* 🚩


                                                                                                                                                                                                                                                            ➖➖➖➖➖➖➖➖➖  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: