गुरुवार, २० जुलै, २०२३

यवतमाळ जिल्ह्यातील माहिती

 #जिल्हा_माहिती


यवतमाळ जिल्हा


यवतमाळ जिल्हा पूर्वी येवतमाळ म्हणून ओळखला जायचा. हा राज्याच्या पूर्व-मध्य भागात विदर्भाच्या प्रदेशात आहे. नागपूर आणि अमरावतीनंतर हा विदर्भातला लोकसंख्येनुसार तिसरा सर्वात मोठा जिल्हा आहे. यवतमाळ शहर हे जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

आर्णी, उमरखेड, कळंब, पांढरकवडा - केळापूर, घाटंजी, झरी जमनी, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, बाभुळगाव, महागाव, मारेगाव, यवतमाळ, राळेगाव, वणी हे या जिल्ह्यातले तालुके आहेत. 

 यवतमाळ पूर्वीच्या बेरार प्रांताचा भाग होता. बेरार सातवाहन राजघराण्याच्या (इ.स.पू. दुसरं शतक ते इसवी सन दुसरं शतक), वाकाटक राजवंश (तिसरं ते सहावं शतक), चालुक्य घराणं ( सहावं ते आठवं शतक), राष्ट्रकूट घराणं (आठवं ते दहावं शतक), चालुक्य (दहावं ते बारावं शतक), आणि शेवटी देवगिरीचे यादव (बारावं शतक ते चौदावं शतक) यांच्या अधिपत्याखाली होतं. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजी यानं हा प्रदेश जिंकला तेव्हा खिलजी राजवटीचा काळ सुरू झाला. चौदाव्या शतकाच्या मध्यात दिल्ली सल्तनतपासून हा प्रदेश विभक्त झाला आणि बहमनी सल्तनतचा भाग झाला. पंधराव्या शतकाच्या शेवटी बहमनी सल्तनतचे पाच तुकडे झाले. १५७२ मध्ये बेरार अहमदनगर इथल्या निजामशाही सल्तनतचा भाग बनलं. निजामशाहीनं १५९५ मध्ये बेरारला मुघल साम्राज्याच्या स्वाधीन केलं. १८ व्या शतकाच्या सुरुवातीला मुघल राजवट कमकुवत झाल्यावर, हैदराबादचा निजाम असफ जाह पहिला, यानं १७२४ मध्ये साम्राज्याचा दक्षिणेकडचा प्रांत (बेरारसह) स्वतःच्या ताब्यात घेतला.

अबुल फजलच्या ऐन-इ-अकबरीमध्ये बेरारची तेरा सरकारांमध्ये किंवा महसूल जिल्ह्यांमध्ये विभागणी करण्यात आल्याचं नमूद आहे. यवतमाळ जिल्ह्यात अकबराच्या काळात कलाम (कळंब) आणि माहूरच्या सरकारांचा समावेश होता. या सरकारांचे काही मोजके महाल आताच्या यवतमाळ जिल्ह्यात होते. यवतमाळ हे यवत- लोहारा या नावाखाली परगण्याचं मुख्यालय म्हणून नोंदीमध्ये आढळतं. लोहारा हे यवतमाळच्या पश्चिमेला ५ किमी (३ मैल) अंतरावर असलेल्या गावाचं नाव आहे. यवत म्हणजे डोंगर, शिखर, पुडा. माळ हा प्रत्यय महाल (परगणा-नगर) चा अपभ्रंश आहे. अकबराच्या काळात या क्षेत्राचा जमीन महसुल दहा लाख रुपयांपेक्षा जास्त होता. 

१८५३ मध्ये बेरारच्या उर्वरित भागासह हा जिल्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनाखाली आला. बेरारची विभागणी पूर्व बेरार आणि पश्चिम बेरारमध्ये करण्यात आली. त्यात यवतमाळ जिल्ह्याचा समावेश पश्चिम बेरारमध्ये करण्यात आला. १८६४ मध्ये यवतमाळ आणि इतर काही तालुक्यांच्या प्रदेशाला सुरुवातीला आग्नेय बेरार आणि नंतर वणी असं नाव देण्यात आलं. १९०३ मध्ये बेरार हे हैदराबादच्या निजामानं भारताच्या ब्रिटिश सरकारला भाड्यानं दिलं असं म्हणतात किंवा ब्रिटिशांकडून भाड्यानं घेतलं असंही म्हणतात. 

यवतमाळ जिल्हा वर्धा आणि पैनगंगा-वैनगंगा खोऱ्याच्या नैऋत्य भागात वसलेला आहे. 

या जिल्ह्याचं क्षेत्रफळ १३,५८२ चौरस किमी (५,२४४ चौरस मैल) (राज्याच्या ४.४१ टक्के)  आहे. जिल्ह्याची एकूण लांबी १९० किलोमीटर (१२० मैल) आहे आणि उत्तर ते दक्षिण रुंदी १६० किमी (१०० मैल) आहे. त्याच्या उत्तरेकडच्या सीमेवर पाणिघाट आहे, ज्याला बेरारची दरी म्हणतात.

जिल्ह्यात पैनगंगा आणि वर्धा या दोन प्रमुख नद्या आहेत. वर्धा मध्य प्रदेशात उगम पावते. पैनगंगा नदी ही वर्धेची मुख्य उपनदी आहे आणि वर्धेत सामील होण्यापूर्वी जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर वाहते. वर्धेच्या इतर उपनद्यांमध्ये यवतमाळ पठारावरच्या बेंबळा आणि निर्गुडा यांचा समावेश होतो. त्या फक्त पावसाळ्यात वाहतात. 

जिल्ह्याचं हवामान कोरडं आणि उन्हाळ्यात मध्यम थंड तर हिवाळ्यात गरम असतं. जिल्ह्यात सरासरी वार्षिक ९११.३४ मिमी (३६ इंच) पाऊस पडतो. जिल्ह्याच्या पश्चिम भागात ८८९ मिमी (३५ इंच) आणि पूर्व भागात ११२५ मिमी (४४इंच) पाऊस पडतो. आहे. नैऋत्य मोसमी हंगामात जवळपास सर्वत्र पाऊस पडतो. अलीकडच्या वर्षांत अतिवृष्टीमुळं पिकांचा नाश होणं आणि जमीन लागवडीसाठी अयोग्य होणं, हा प्रकार वाढला आहे.

यवतमाळ शहर आणि जिल्ह्याची भारतातल्या सर्व प्रमुख शहरांशी आणि महाराष्ट्राशी वाहतुकीची चांगली जोडणी आहे. राष्ट्रीय महामार्ग ७ या जिल्ह्यातून जातो. तर राज्य महामार्ग ३६१ हा यवतमाळ शहर आणि जिल्ह्यातून जातो. खांडवा (म.प्र.) ते करंजी हा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग परतवाडा, अमरावती, यवतमाळ मार्गे जाणार आहे. जिल्ह्यात जवाहरलाल दर्डा विमानतळ भरी इथं आहे. यवतमाळ-मूर्तिजापूर रेल्वे मार्ग आणि वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्ग, यांचं काम चालू आहे. भारतातली पहिली ब्रॉडगेज मेट्रो नागपूर ते यवतमाळपर्यंत धावणार आहे. 

ज्वारी आणि कापूस हे जिल्ह्याचं मुख्य उत्पादन आहे. कापूस आणि सागवान ही इथली प्रमुख निर्यात आहे. निर्यात होणाऱ्या इतर वस्तूंमध्ये चुना, लाकडी फर्निचर आणि संत्री यांचा समावेश होतो. सोयाबीन हे महत्त्वाचं पीक आहे. २००६ मध्ये पंचायत राज मंत्रालयानं यवतमाळला देशातल्या २५९ सर्वाधिक मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक मानलं आहे. 

या जिल्ह्याच्या जमिनीत डेक्कन ट्रॅप खडक आहे. लाव्हा बेड. त्यावर या जिल्ह्यात खाणकाम चालतं. हा जिल्ह्याच्या उत्पन्नाचा एक भाग आहे.

जिल्ह्यात बिटरगाव, टिपेश्वर, तिवसाळा आणि उंबर्डा इथं सामाजिक वनिकरण जंगलं आहेत. तिथल्या झाडांमध्ये साग, तेंदू, हिरडा, आपटा आणि मोहा, बांबू यांचा समावेश होतो. जंगलात आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये जंगली अस्वल, हरीण, नीलगाय, सांबर, हायना आणि मोर यांचा समावेश होतो. टिपेश्वर आणि पैनगंगा इथं वन्यजीव अभयारण्य आहेत. टिपेश्वरला व्याघ्र प्रकल्प करण्याची तयारी सुरू आहे.

आर्णी आणि दिग्रस तालुका ही तीर्थक्षेत्रे आहेत. बाबा कंबलपोश आणि घंटीबाबा मंदिर यासाठी प्रसिद्ध आहेत. कळंबचं चक्रवती नदीच्या कधी चिंतामणी मंदिर, घाटंजीतलं मारोती महाराज मंदिर, रंगनाथ स्वामी, वणी, अंबा देवी, केळापूर आणि जांभोरा माहूर इथलं दत्त मंदिर प्रसिद्ध आहे. नेर तालुक्यात धनज माणिकवाडा फकीरजी महाराज संस्थान आहे. 

जिल्ह्यात गोंड राजा, गोंड, गोंड परधान, कोलाम, आंध आणि बंजारा हे समुदाय आहेत. 

लाभ वन्यजीव अभयारण्य, सहस्त्रकुंड धबधबा, पेनगंगेच्या काठावर कपेश्वर जंगल आणि गरम पाण्याचे झरे आहेत. सहस्त्रकुंड धबधबा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. या धबधब्याच्या अलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यात येतो तर पलिकडचा भाग यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड तालुक्यात आहे.

महाराष्ट्रावर सर्वाधिक काळ म्हणजे १९६३ ते १९७५ पर्यंत राज्य करणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि अल्पकाळ मुख्यमंत्री आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राहिलेले सुधाकरराव नाईक, विदर्भाचा वाघ म्हटले जाणारे आणि विदर्भ जनता काँग्रेसचे संस्थापक जांबुवंतराव धोटे, भारतीय फील्ड हॉकी खेळाडू आकाश चिकटे, लोकमत दैनिकाचे संस्थापक आणि राज्याचे मंत्री जवाहरलाल दर्डा, क्रिकेटपटू अलिंद नायडू, ललित यादव, भौतिकशास्त्रज्ञ फहीम हुसेन, वकील आणि मराठी गझलकार वासुदेव वामन उर्फ भाऊसाहेब पाटणकर हे याच जिल्ह्यातले. लंडनमध्ये गाजलेल्या आजीबाई बनारसे याही याच जिल्ह्यातल्या.

यवतमाळ शहर नगरपरिषद आहे. हे यवतमाळ जिल्ह्याचं प्रशासकीय मुख्यालय आहे. हे शहर एका पठारावर वसलेलं आहे, जे इतर तालुक्यांपेक्षा तुलनेनं जास्त उंचीवर आहे. पूर्वी येओती किंवा येवतमाळ म्हणून ओळखलं जाणारं यवतमाळ हे बेरार सल्तनतचं मुख्य शहर होतं आणि जुन्या लिखाणानुसार जगातलं सर्वात सुरक्षित ठिकाण होतं. १८६९ मध्ये यवतमाळ नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली, परंतु त्यानंतर लगेचच ती विसर्जित करण्यात आली. १८९४ मध्ये ती पुन्हा स्थापन झाली आणि जिल्ह्यातली सर्वात जुनी नगरपरिषद बनली. एलियट हे इथले पहिले महापौर होते आणि लेफ्टनंट डब्ल्यू. हेगे उपमहापौर होते. गोविंद पुनाजी बारी हे यवतमाळ नगरपरिषदेचे पहिले भारतीय अध्यक्ष होते. (२ जाने. १९१४ ते ३१ मे १९३२). २२ डिसेंबर १९३४ रोजी नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी पहिली निवडणूक घेण्यात आली होती. त्यापूर्वी त्यांची नियुक्ती करण्यात येत असे.

या जिल्ह्यात शकुंतला नावाची मिनी ट्रेन ही ब्रिटिश सरकारनं कापसाची वाहतूक करण्यासाठी बांधली होती. ती ऐतिहासिक ट्रेन आता बंद आहे.

या शहरात उष्णकटिबंधीय हवामान आहे. यवतमाळमध्ये वार्षिक सरासरी तापमान २६.८ अंश सेल्सिअस असतं. इथं सरासरी ९४६ मिमी पाऊस पडतो.

ब्रिटिश राजवटीत यवतमाळ शहर हिल स्टेशन म्हणून वर्गीकृत होतं. यवतमाळमध्ये कापूस-जिनिंग आणि प्रेसिंग दोन्ही चालतं. हे शहर जिल्ह्यातलं प्रमुख व्यापारी केंद्र आहे. तिथून २९ मैल (४७ किमी) अंतरावर असलेल्या धामणगाव स्टेशनशी रस्त्यानं जोडलेलं आहे. यवतमाळमधल्या प्रमुख उद्योगांमध्ये जीन्ससाठी डेनिम फॅब्रिक्स तयार करणाऱ्या रेमंड यूसीओ मिलचा समावेश आहे. 

लोहारा, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, वणी, उमरी, केळापूर, राळेगाव बाभूळगाव, नेर, आणि वणी-मारेगाव इथं प्रमुख औद्योगिक केंद्र आहेत. यवतमाळ शहर, आर्णी, वणी, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, मोहडा, पुसद, उमरखेड आणि केळापूर  या मुख्य बाजारपेठा आहेत.

जिल्ह्यात पुसद हा तालुका आहे. पूस नदीच्या नावावरून हे नाव पडलं आहे. त्याचं प्राचीन नाव 'पुष्पवंती' होतं. पुसद हे यवतमाळ जिल्ह्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे. पुसद हा आदिवासी भाग आहे. बंजारांची संख्या जास्त आहे. १३ व्या शतकातली हेमाडपंती स्थापत्यकलेची दोन मंदिरं, १८७४ साली बांधलेली एक उत्तम टाकी इथं आहे.

इथली मुख्य पिकं बाजरी, गहू, तूर, कापूस, भुईमूग, सूर्यफूल आहेत. पुसद तालुक्यातील डोंगराळ भागात मातीचा प्रकार खडबडीत किंवा काळ्या रंगाचा सैल भुसभुशीत आहे. सिंचनासाठी पूस नदीवर मध्यम आकाराचं पुसद शहराच्या वायव्येला १८ किमी (११ मैल) वरचं पूस धरण १९७१ मध्ये बांधलं गेलं. नंतर १९८३ मध्ये पुसदच्या पूर्वेला ४० किमी (२५ मैल) महागावजवळ खालचं पूस धरण बांधलं गेलं. कार्प माशांचा मत्स्यपालनाच्या व्यवसाय इथं चालतो. १९५८ च्या पूर्वीपासून पुसदमध्ये कापूस जिनिंग आणि ऑइल प्रेस कारखाने आहेत.

उमरखेड हे पैनगंगा नदीजवळील नगरपालिकेचं शहर आहे. ते तालुक्याचं ठिकाण आहे. हे यवतमाळपासून ११० किमी अंतरावर आहे. हे तिन्ही बाजूंनी पर्वत आणि घाटांनी वेढलेलं आहे आणि त्याच्या एका बाजूनं सपाटी आहे. उमरखेड शहरापासून ३.६ किमी अंतरावर असलेल्या चुरमुरा गावाजवळ अंबोना तलाव हे पर्यटन स्थळ आहे. नौकाविहार आणि सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. उमरखेडपासून किमी अंतरावर जेवली गावाजवळ पैनगंगा नदीतला सहस्रकुंड धबधबा आहे. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये इथं पर्यटक येतात.

उन्हाळ्यात इथलं तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढतं, तर हिवाळ्यात ८ ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरतं.

पैनगंगा वन्यजीव अभयारण्य इथं आहे. पैनगंगा नदी या अभयारण्याच्या तिन्ही बाजूंनी वाहते. हे ३२५ चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेलं आहे. यात विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आहेत. पैनगंगा वन्यजीव अभयारण्यात मिश्र पानझडी जंगलं आणि सागवान जंगलं आहेत. प्राण्यांच्या असंख्य प्रजातींमध्ये कोल्हा, बिबट्या, जॅकल, हरे, चार शिंगांचा काळवीट, पोर्क्युपिन, सांबर, नीलगाय, काळवीट, चिंकारा आणि इतर अनेकांचा समावेश आहे. पक्षी निरीक्षकांसाठी गिधाड, बुलबुल, कबूतर, किंगफिशर, कोकिळ, पतंग आणि इतर आहेत. पैनगंगा वन्यजीव अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे जानेवारी ते जून. 

वणी तालुका यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्व भागात असून चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे. एक तालुका असूनही, वणी हे बाजारपेठेमुळं महत्त्वाचं व्यावसायिक केंद्र आहे. यवतमाळ शहर वणीपासून ११९ किमी आणि चंद्रपूर फक्त ५५ किमी अंतरावर आहे. पूर्वी वणीला 'वुन' म्हणून ओळखलं जात असे. शहराला निर्गुडा नदी आहे, जी पुढं वर्धा नदीत विलीन होते.

कोल इंडिया लिमिटेडची वेस्टर्न कोलफिल्ड्स ही उपकंपनी वणी शहराच्या परिसरात कोळसा खाण चालवते शहराजवळ उकनी, पिंपळगाव, जुनाड, कोलारपिंप्री, राजूर, कुंबरखणी, घोन्सा, नीलजाई, नायगाव या कोळसा खाणी आहेत.

तालुक्याची अर्थव्यवस्था मुख्यतः आजूबाजूच्या परिसरातली शेती आणि खाण व्यवसायांवर चालते. अनेक कापूस जिनिंग आणि प्रेसिंग युनिट्सदेखील कार्यरत आहेत. अलिकडच्या काळात कापूस बियाणं तेल मिलिंग युनिटदेखील सुरू झालीत. याशिवाय चुनखडीच्या उपलब्धतेमुळं वॉल पुटी उत्पादन युनिट्स इथं ग्रामीण भागात कार्यरत आहेत. एमआयडीसीमध्ये मेटल फॅब्रिकेशन युनिट, सिमेंट प्रीकास्ट आणि पाईप बनवण्याचं युनिट, डाळ मिल (पल्स प्रोसेसिंग फॅक्टरी) इ. आहेत.

कोळशाचे प्रचंड साठे आणि लगतच्या भागात असलेल्या अनेक कोळशाच्या खाणींमुळं या शहराला ब्लॅक डायमंड सिटी हे नाव पडलं आहे. कापूस आणि सोयाबीन ही प्रमुख पिकं आहेत.

परिसरात चुनखडीची उत्खननही केली जाते.

रंगनाथ स्वामी मंदिर, जैताई माता मंदिर, जोड-महादेव मंदिर, जैन स्थानक, संभवनाथ जैन मंदिर, काळाराम मंदिर, साई मंदिर, जगन्नाथ महाराज मंदिर, हनुमान मंदिर, महाकाली माता मंदिर, गणपती मंदिर, शिवमंदिर, शनी मंदिर, राम मंदिर, विठ्ठल मंदिर, संत गाडगे बाबा मंदिर, जटाशंकर मंदिर, गजानन महाराज मंदिर, दत्त मंदिर, जगदंबा मंदिर, महादेव मंदिर, जामा मशीद, मस्जिद ई हयात, नगिना मशीद, मदिना मशीद, अक्सा मशीद, दर्गाह हजरत सय्यद मुराद अली शाह बाबा, दर्गा ख्वाजा मोहम्मद हयात, शीख गुरुद्वारा, सिंधी गुरुद्वारा, मेथोडिस्ट चर्च, नवीन मेथडिस्ट चर्च एवढं सगळं या शहरात आहे.

दारव्हा हा तालुका आहे. यवतमाळ जिल्ह्यातलं एक शहर आणि नगरपरिषद आहे. रंगो बापूजी गुप्ते हे स्वातंत्र्यसैनिक शहरात गुप्तपणे राहत होते, असं इथं सांगितलं जातं. हे शहर 'गोळीबार चौक' या चौकासाठीदेखील प्रसिद्ध आहे. इथं ब्रिटिश सैनिकांनी निशस्त्र मेळाव्यावर गोळीबार केला होता.

दारव्हा इसवी सन १८०० ते १९०० या काळात शेंगदाणा तेल आणि कापसाच्या मोठ्या बाजारपेठांपैकी एक होतं. तिथं ८ जिनिंग आणि २०९ तेल घाणी होत्या. सातवाहन काळात दारव्हा हे गुरं, दुग्धजन्य पदार्थ, कापूस आणि कापूस बियाण्यासाठी प्रसिद्ध बाजारपेठ होतं.

दारव्हा शहरापासून दोन किमी अंतरावर दिग्रस रस्त्यावर बैरागी बाबा मठ आहे. त्याची स्थापना रंगो बापूजी गुप्ते यांनी केली होती. ब्रिटिश शासकांपासून ते इथं लपून राहिले होते. 

जिल्ह्यातलं महागाव हे कॉटन टाउन म्हणून ओळखलं जाणारं छोटं तालुक्याचं गाव आहे. महागाव जवळपास सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे. पूस नदी इथून वाहते. ती पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाच्या पाण्याचाही स्रोत आहे.

महागाव गावात साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. महागाव गावाचा साक्षरता दर महाराष्ट्राच्या ८२.३४% च्या तुलनेत ८५.५४% आहे. महागावमध्ये पुरुष साक्षरता ९१.३१% आहे, तर महिला साक्षरता दर ७९.६८% आहे.

महागाव आणि आजूबाजूचा परिसर बहुतांशी उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणून शेतीवर अवलंबून आहे. पूस धरण, वेणी धरणामुळं या भागातली जमीन चांगली सिंचनाखाली आहे. पूस नदीतून शेतीला थेट सिंचनाचं पाणीही मिळतं. 

इथल्या मुख्य पिकांमध्ये ऊस, कापूस, सोयाबीन, बंगाल हरभरा, ज्वारी आणि गहू यांचा समावेश होतो. शहरात कापूस आणि धान्याची बाजारपेठ आहे. महागावची मुख्य पिकं कापूस व ऊस ही असल्यानं वसंत सहकारी साखर कारखाना, वसंतनगर आणि पुष्पवंती सहकारी साखर कारखाना, सवना हे दोन सहकारी साखर कारखाने आहेत. पिंपळगाव इथं बाबासाहेब नाईक कॉटन मिल आहे.

जिल्ह्यात तालुका असलेलं आर्णी हे गाव अरुणावती नदीच्या काठावर वसलेलं आहे.आर्णी कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कापूस पिकाची शेती आहे. इथं मोठा धान्य बाजार आहे आणि ३ उप-धान्य बाजार आणि एक खाजगी धान्य बाजारदेखील आहे.

आर्णी यवतमाळनंतर जिल्ह्यातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. शहरात ५ कापूस जिनिंग आणि प्रेसिंग मिल्स, २ पीनट मिल्स आणि एक डाळ मिल आहेत.

तालुका केळापूर (ज्याला पांढरकवडा असंही म्हणतात.) हे भारताच्या हे श्रीनगर - नागपूर - हैदराबाद - बंगलोर - कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग ४४ वर आहे.

मल्लिकार्जुन मंदिर, घंटी बाबा मंदिर, भवानी देवी मंदिर, रामानंद महाराज मठ, शनी मंदिर, नगिना मशीद, लाल इमारत इथं प्रसिद्ध आहेत.

जिल्ह्यात घाटंजी हे खूप जुनं शहर आणि नगरपरिषद आहे. या भागात शेतकरी दर्जेदार कापसाचं उत्पादन घेत असल्यानं याला 'कॉटन सिटी' असंही म्हणतात. हे तालुक्याचं ठिकाण वाघाडी नदीच्या काठी आहे. वाघाडी नदी आणि तिच्या धरणामुळं पाण्याची सोय आहे. सागवान लाकूड, निलगिरीची झाडं आणि इतर अनेक मसाल्यांच्या झाडांचा समावेश असलेलं भरपूर वनक्षेत्र इथं आहे. या जंगलांमध्ये विविध प्रकारचे प्राणी राहतात.

नेर यवतमाळ जिल्ह्यातला तालुका आहे. फकीरजी महाराज मंदिर, गणपती मठ नावाचं गणेश मंदिर, सोमेश्वर मंदिर, जामा मशीद, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कापूस बाजार यांचा समावेश आहे.

राळेगाव यवतमाळ जिल्ह्यातलं तालुक्याचं ठिकाण आहे. राळेगाव कापूस उत्पादनात आणि सोयाबीन आणि इतर डाळींच्या उत्पादनात विशेष आहे. हे महाराष्ट्राची कापसाची राजधानी म्हणूनही ओळखलं जातं. या तालुक्यात दहाहून अधिक जिनिंग व प्रेसिंग व एक रॉ ऑइल मिल आहे. 

पूर्वी हे शहर यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा तालुक्याचा भाग होता आणि नंतर तो तालुका झाला. 

तालुका कळंब गणेश आणि मुस्लिम विद्वान बाबा बासुरीवाले यांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. कळंबकचं गणेश मंदिर हे विदर्भातल्या अष्टविनायकापैकी एक आहे. 

सतराव्या शतकाच्या सुरुवातीला हे गाव मुघल साम्राज्याच्या अंतर्गत त्याच नावाच्या सरकारची (सुभा) राजधानी होतं. एक महत्त्वाचं महसूल गाव होतं. त्याचं नाव पूर्वी 'कलाम' असं होतं.

बाभुळगाव हा यवतमाळ जिल्ह्यातला तालुका आहे. यवतमाळपासून २२ किमी अंतरावर आहे.

झरी जमनी हाही यवतमाळ जिल्ह्यातला तालुका आहे.

मारेगाव हा यवतमाळ जिल्ह्यातला तालुका आहे. मारेगाव हे एक लहान गाव आहे. इथं २०१५ मध्ये नगर पंचायत घोषित करण्यात आली. हे वणी यवतमाळ रस्त्यावर वणीपासून १८ किमी अंतरावर आहे.

इथला प्रमुख व्यवसाय शेती आहे. कापूस आणि सोयाबीन ही दोन्ही महत्त्वाची पिकं आहेत. काळी माती आहे. मारेगाव इथं तहसील कचेरी, पंचायत समिती, दिवाणी न्यायालय व इतर कार्यालयं व बँका आहेत. मार्डी रस्त्यावर चार किमीवर सिमेंट कारखाना, नवरगाव इथं धरण, नरसाळा इथं स्टोन व क्रशर खाणी, वणी रस्त्यावर गौराळा इथं चुनखडीच्या खाणी आहेत.

दोन जिनिंग आणि प्रेसिंग कारखाने आहेत. लोकसंख्येमध्ये बहुतेक आदिवासींचा समावेश आहे. त्यात गोंड आणि कोलाम जमाती आहेत. या तालुक्याचं विभाजन करूनच ‘झरी-जमनी’ हा दुसरा तालुका तयार करण्यात आला आहे. या भागात अलीकडच्या काळात नवीन कोळशाच्या खाणींचा शोध लागला आहे. लोअर पूस धरण, फॉक्सटेल इको रिट्रीट, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य इथं आहे.

बोरेगाव बांध - यवतमाळपासून ५ कि.मी. अंतरावर बोरेगाव बांध हे लोकांच्या पाहण्याचं ठिकाण आहे. 

टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य - यवतमाळमधल्या सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांमधे या अभयारण्याचा समावेश होतो. १४८.६३ वर्ग किलोमीटर परिसरात पसरलेल्या या अभयारण्याला निसर्गाचं वरदान आहे. अनेक प्रकारच्या वनस्पती या ठिकाणी आहेत. या जंगलात वाघ, जंगली डुक्कर, चित्ता, हरिण, ब्ल्यू बेल, एंटीलोप्स, बाइसन पाहायला मिळतात.

यवतमाळ जिल्ह्यातून संत्रा, लिंबू आणि लाकडाचं फर्निचर यांची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते.

संकलन:-गजानन गोपेवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: